Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना सरकारी बंगला खाली करण्याच्या सूचना; नेमकं कारण काय?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पहिल्यांदा मंत्रीमंडळ विस्तारामध्ये वगळलेल्या छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रीपद देण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा विभागाचे खातं छगन भुजबळ यांना देण्यात आलं आहे.
तसेच धनंजय मुंडेच्या सध्या ताब्यात असलेला सातपुडा बंगला देखील छगन भुजबळ यांना देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नोटिफिकेशन काढून धनंजय मुंडेना 15 दिवसांत बंगला खाली करून देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडे यांच्याकडील खात भुजबळांकडे
सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार छगन भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या या खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील मंत्रिपदाची जागा गेले काही महिने रिक्त ठेवण्यात आली होती. बुधवारी (ता. २१) भुजबळ यांची या जागेवर वर्णी लावण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.




