मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. बदनाम लोकांचे जर मी पुरावे देत असेल तर मला काही फरक पडत नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवणार, तसेच धनंजय मुंडे यांनी जर कृषी खात्याचे मंत्री म्हणून काम केले असते तर त्यांना खात्यात काय सुरू आहे, याची माहिती मिळाली असती. मात्र, त्यांनी बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम केले. त्यांनी त्यांच्या मामींची जमीनही लाटली असं म्हणत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाण साधला. अंजली दमानिया म्हणाल्या, मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी जर वेळ दिला असता तर त्यांना सगळं कळले असते. पण यांनी बीडमध्ये जाऊन दहशत पसरवली. त्यांनी जमिनी लाटण्याचे काम केले. त्यांनी आपल्या मामींचीही जमीन बळकावली, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. पुढे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी मला बदनामिया असे नाव ठेवले. खरं तर त्यांनी पुराविया असे ठेवायला पाहिजे होते. पण बदनाम लोकांना त्यांचे पुरावे मी देत असेल, तर मला कुठलंही नाव चालेल. त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना वस्तू वगळण्याचे अधिकार दिलेले नाहीत : अंजली दमानिया यावेळी दमानिया म्हणाल्या, 12 एप्रिल 2018 चा जीआर आहे. दिनांक 5 डिसेंबर 2016 च्या परिच्छेद एक मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाथ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तुंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापी, वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कृपया याची नोंद घ्या. मुख्यमंत्र्यांना वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. डॉक्युमेंट नंबर 26 अपलोड केलेले आहे, ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे, असे आवाहन देखील अंजली दमानिया यांनी यावेळी केले. दमानिया यांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे : धनंजय मुंडे कृषी विभागातील वस्तुंची खरेदी निविदा प्रक्रिया नियमांना धरुनच असल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले होते. अंजली दमानिया यांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे आणि धादांत खोटे. हे सगळं केवळ बदनामीसाठी सुरु आहे. अंजली दमानियांनी खोटे बोलणे थांबवावे असं धनंजय मुंडे म्हणाले. तसेच कृषी विभागातील खरेदी किंमत दमानियांना विचारून सरकारने ठरवायची का? असा सवालही त्यांनी केला.