Lok Sabha Election Result 2024 । बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव.. धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं विधान; थेट म्हणाले….

Dhananjay Munde । Pankaja Munde । Lok Sabha Election Result 2024 | लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल मंगळवारी 4 जून रोजी जाहीर करण्यात आले. देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 294 जागा तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना 17 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला जनतेने साथ दिल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांपैकी, महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत.
यामध्ये भाजप 9, शिंदे गट 7, अजित पवार गट 1, ठाकरे गट 9, शरद पवार गट 8, काॅंग्रेस 13 तर इतर 1 अशा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकाचा चांगलाच झटका बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 42 जागांवर यश आलं होतं. पण हाच आकडा 18 वर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 15 जागांवर दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.
बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच येथे अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता. अखेर रात्री शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मोठा विजय मिळवला. पंकजा यांना आपल्या विजयाची खात्री होती. मात्र या निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र, अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून यावर आता स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला. विजयी उमेदवाराचे युद्ध अभिनंदन करतो.
मात्र, अजूनही सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासियाची आहे, असे आवाहन जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांनी केले आहे.
राज्यात महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादाबद्दल सर्व जनतेचे आभार.
बीड मध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ.
स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे.…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 5, 2024
ते पुढे म्हणाले, ‘क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै’ स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.





