म्हसवड (प्रतिनिधी) – म्हसवड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी धनाजी रामचंद्र माने यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. याबाबतची घोषणा मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केल्यावर माने यांच्या शेकडो समर्थकांनी पालिकेबाहेर हलगीचा कडकडाट करत फटाक्यांची आतषबाजी केली.
यापूर्वीच्या उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा 21 जानेवारीला दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक झाली. या पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी सत्ताधारी गटनेते धनाजी माने यांनी सत्ताधारी व विरोधी गटाशी चर्चा करून कागदोपत्री सर्वांचा पाठिंबा घेतला होता.
माझ्यावर सर्वच सदस्यांनी विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे; परंतु खरे आभार मला म्हसवडकर जनतेचे मानायचे आहेत. त्यांनी आजवर माझ्यावर विश्वास दाखवल्यानेच मी नगरसेवक होऊ शकलो. यापुढील कार्यकाळ फक्त जनतेसाठीच राहणार आहे. शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
– धनाजी माने,
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, म्हसवड
धनाजी माने यांच्या या पत्रानंतर नगराध्यक्ष तुषार वीरकर यांनी बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्याना अहवाल पाठवला. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी उपाध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार पालिकेत झालेल्या विशेष सभेत उपाध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाकडून धनाजी माने यांचा अर्ज दाखल झाला.
विरोधी गटाकडूनही एक अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली; परंतु विरोधी गटाकडून भरण्यात आलेला अर्ज मागे घेण्यात आल्याने उपाध्यक्षपदी धनाजी माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले.