पुणे जिल्हा | वडगाव काशिंबेग येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी

मंचर, (प्रतिनिधी) – संकष्टी चतुर्थीनिमित्त अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीचे भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. पावसाचे वातावरण असूनही भाविक लांबवरून दर्शनासाठी आले होते.
अंगारक चतुर्थी झाल्यानंतर आलेली ही पहिली संकष्टी चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी झाली. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थानात बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे देवस्थानचे पुजारी जगदीश पुरुषोत्तम जोशी यांनी महापूजा केली. त्यानंतर सुदाम मोरडे, व्यावसायिक संतोष कडूसकर, हरिचंद्र गाडे , शैलेश गायकवाड, सुदर्शन कोकणे व इतर भाविकांचे हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळची महाआरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही दिवसभर भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत होते. दुपारी काहीशी उघडीप मिळाल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. मात्र, सायंकाळी गर्दीत वाढ होऊन भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या.
रात्री उशिरापर्यंत भाविक रांगेतून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत दर्शन घेत होते. दुपारी तीन वाजता व सायंकाळी सात वाजता मुख्य आरती झाली. चंद्रोदय झाल्यानंतर श्रीस नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम झाला. दरम्यान येथील पेशवेकालीन अर्धपीठ गणपती मंदिरावर उद्योजक शाम गुंजाळ यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मंदिर पायथ्याशी प्रसाद, नारळ ,फुले, पेढे यांची दुकाने थाटण्यात आली होती. दुपारी मोरया मंगल कार्यालयाचे मालक सुजित लांडे यांच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. उद्योजक नरेंद्र पापा घुले यांच्या वतीने भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मंदिर परिसरात नव्याने भव्य शेड बांधण्यात आल्याने भाविकांना पावसाचा फारसा त्रास झाला नाही. येथील विकास कामे मार्गी लावली जात असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. दरम्यान दिवसभरात अनेक भाविकांनी नवस्पूर्ती केली. श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टने व्यवस्था पाहिली.





