भक्तांना महागाईची झळ; गणेशमुर्ती २० टक्कांनी महागल्या

निघोज – श्रावणमास सुरू झाल्यानंतर गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले आहे. गणेशमूर्ती कलाकार गणेशमूर्तींवर अखेरचा हात देण्यात मग्न आहेत. वाढत्या महागाईचा फटका यंदा गणेशोत्सवात बसणार असल्याने बाजारात गणेशमूर्ती विक्रीवर परिणाम जाणवणार आहे. कच्चा माल, मजुरी आदींचे भाव वाढल्याने यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती वीस टक्क्यांनी महागल्या आहेत.
श्रावण महिना सुरू होताच वेध लागतात गणेशोत्सवाचे. गणेशभक्तांमध्ये उत्साह संचारला जातो. विक्रीसाठी गणेशमूर्ती बाजारात आणण्यासाठी लगबग सुरू होते. यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. ग्रामीण भागात यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. सर्वत्र उत्साह असताना मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य, कच्च्या माल आणि मजुरी यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच सतत विजेचा खोळंबा होत असल्याने अडचणीत भर पडली आहे.
सध्या कारखान्यांत गणेशमूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य महागले. अडीच फूट मूर्ती बनवण्यासाठी जिथे दोनशे रुपये खर्च येतो. तिथे यावर्षी अडीचशे रुपये खर्च होतात. याचा परिणाम मूर्ती विक्रीवर होणार आहे. परिणामी यंदा गणेशमूर्तीच्या किमती वीस टक्क्यांनी वाढणार आहेत.
गणेशमूर्ती खरेदी करताना प्रत्येक गणेश भक्तांना व गणेश मंडळांना वाढीव रक्कम मोजावी लागेल. गणेशमूर्ती बरोबरच यंदा सजावट, लाईट डेकोरेशन, महाप्रसाद मंडप, फुल हार यांच्याही किमतीत वाढ होणार असल्याने सध्या तरी गणेशोत्सवावर महागाईचे सावट आहे. दरम्यान, निघोज येथील गणपती मूर्तीनां नगरसह शेजारच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून मोठी मागणी असते.
गणेशमूर्ती बनवण्याचे काम करणाऱ्या कामगारांचा संसाराचा गाडा या एकमेव व्यवसायावर अवलंबून असतो. त्यासाठी वर्षभर मेहनत घेतली जाते. मात्र कष्ट करून बनवलेल्या मूर्ती जेव्हा विक्रीसाठी बाजारात आणली जाते. तेव्हा गणेशभक्तांकडून या मूर्तीची किंमत होते. हे खेदजनक आहे. आम्ही मूर्ती बनवताना स्वतःला झोकून देऊन दिवसरात्र काम करतो. मात्र या मूर्तीची किंमत गणेशभक्तांनी करु नये.
– विक्रम श्रीमंदिलकर, गणेशमूर्ती कारागिर, निघोज





