Bhimashankar | व्हीआयपी दर्शनामुळे भीमाशंकर येथे रांगेतील भाविक वैतागले

प्रभात वृत्तसेवा
मंचर – श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, या ठिकाणी दिवसभरात विविध क्षेत्रातील व्हीआयपी लोक दर्शनासाठी येत असल्याने त्याच्या दर्शनामुळे रांगेत उभे असलेले भाविक वैतागले आहेत. देवस्थान ट्रस्टने व्हीआयपी दर्शनासाठी योग्य ती स्वतंत्र उपाययोजना करावी,तसेच श्रावण महिन्यातील यात्रा काळात व्हीआयपी लोकांचे अभिषेक बंद करावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे वर्षाचे बाराही महिने भाविक भक्त, पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे यात्रा भरत असल्याने तसेच श्रावण हा हिंदूंचा पवित्र महिना असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. श्रावणी सोमवारी व सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी दर्शनासाठी रात्रीपासूनच पहाटेपर्यंत रांगा लागत असतात. मात्र, सर्वसामान्य भाविक दर्शन घेत असताना विविध राज्य, परदेशातून येणाऱ्या अनेक व्हीआयपी लोकांसाठी तात्काळ दर्शनाची सोय केली असल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी तासंतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.
त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रावण महिन्यात सोमवारी, शनिवारी,रविवारी शासनाचे विविध विभागातील अधिकारी, नातेवाईक कुटुंब, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व त्यांचे कुटुंबीय दर्शनासाठी येत असतात. त्यांना तातडीने दर्शन हवे असते. तसेच ते अनेकदा मंदिरात अभिषेक करण्याचाही आग्रह धरतात. या सर्व प्रक्रियेला मोठा वेळ लागतो व त्यामुळे रांगेत उभे असलेल्या भाविकांना तात्काळ दर्शन मिळत नाही. त्यामुळे भाविकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. व्हीआयपी दर्शनामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे देवस्थान ट्रस्टच्या वतीने व्हीआयपी दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करावी किंवा त्यावर उपाययोजना करून श्रावण महिन्यात अभिषेक काही दिवस बंद करावे,अशी मागणी भाविकांनी केली आहे.
व्हीआयपी दर्शनामुळे रांगेतील भाविक नाराज होतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आता ऑनलाईन दर्शन पास सुविधा प्रायोगिक तत्त्वावर चालू असून नेटवर्कमुळे काही प्रमाणात अडथळा येतो. त्यावरही मार्ग काढण्याचा प्रयत्न देवस्थानचा आहे. भाविकांसाठी ऑनलाइन दर्शन सुविधेसाठी स्कॅनर उपलब्ध केला जाणार असून त्या माध्यमातून व्हीआयपी किंवा इतरांनाही दर्शन सुविधा तातडीने देण्याची देवस्थानची तयारी आहे.
-सुरेश कौदरे,अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान.




