पुणे जिल्हा | थेऊरला भाविकांची दर्शनासाठी गर्दी

थेऊर, (वार्ताहर)- अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला श्री चिंतामणी मंदिरात रविवारी (दि.२६) भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उन्हाळी सुट्टीत व रविवारी चतुर्थी असल्याने कुटुंबासह भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याने थेऊरला जत्रेचे स्वरूप आले होते.
चंदनाचा लेप लावलेल्या स्वयंभू मूर्तीला हार- तुऱ्यांची सजावट, धूप अत्तराचा दरवळत असलेला सुंगध यातून ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
आगलावे बंधु यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ची पूजा केली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल्स ग्राहकांनी गजबजले होते. दर्शन रांगामुळे मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपवासाच्या खिचडी व चिवड्याचे वाटप करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. उष्णतेमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरात जागोजागी मोठे कूलर लावण्यात आले होते. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आली. गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली आहे. देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून आहेत.
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि दर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे कार्य केले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था केली होती. दुपारी देवस्थानतर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. दरम्यान, सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ. प. माऊली महाराज जाधव कीर्तन केसरी जालना यांचे सुभाष्य कीर्तन पार पडले.





