Pune District : श्रीक्षेत्र भालगुडीत महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी हजारो भाविक दाखल

पौड : श्रीक्षेत्र भालगुडी (ता. मुळशी) येथील शासनाचा ‘क’वर्ग दर्जा प्राप्त असणारे व कोळवण खोऱ्यासह मुळशी -मावळ तालुक्यातील तसेच पुणे -मुंबई व राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध व जागृत श्री स्वयंभू नारायणदेव देवस्थान येथे दर्शनासाठी महाशिवरात्रीची पर्वणी साधून हजारो भक्तांची मांदियाळी दर्शनासाठी जमणार आहे. उत्सवाचे यंदा 57 वर्ष असून यामध्ये दररोज काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिकीर्तन हरिजागर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मुळशी तालुक्यातील निसर्ग संपन्न कोळवण खोऱ्यातील, शिवकालीन तिकोना किल्ला परिसरातील श्रीक्षेत्र भालगुडी हे गाव पुण्यापासून साधारणता 40 किलोमीटर अंतरावर असून या गावांमध्ये डोंगर पायथ्याला स्वयंभू नारायणदेव हे मंदिर आहे. साधारणता सहा फूट उंचीची ही मूर्ती दुर्मिळ आहे. कारण तिच्या हातातील शंख,चक्र,गदा व वरद मुद्रा हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्तीच्या उजव्या हातात शंख, डाव्या हातात चक्र, खालच्या डाव्या हातात गदा असून उजवा हात वरद मुद्रेच्या स्थितीत आहे. मूर्तीच्या डोक्यावर किरीट मुकुट आहे. मंदिर परिसरात भैरवनाथ मंदिर व जिवंत झऱ्याचे पाणी गोमुखातून विहिरीत येते. पूर्वी हे मंदिर काळ्या पाषाणामधील होते नंतर मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले.
ही मूर्ती एका विशेष घटनेत सापडली असून शेजारच्या गावातून एक ससा देवाच्या रूपामध्ये पळत आला आणि लोक त्याचा पाठलाग करीत होते आणि तो ससा एका बिळामध्ये गेला. आणि लोकांनी ते बिळ खणल्यानंतर त्यांना तेथे विष्णूची मूर्ती सापडली. त्यानंतर या मूर्तीची स्थापना करून मंदिर बांधले गेले. त्या बिळाचा अवशेष अद्याप मंदिरात आहे. – संतोष बबन साठे (उपाध्यक्ष भाजपा मुळशी ,ग्रामस्थ श्रीक्षेत्र भालगुडी)
महाशिवरात्री निमित्त सकाळी ब्रह्मवृंदाकडून वेदमंत्राच्या घोषात अभिषेक होणार आहे. श्री चे पंचोपचार स्नान,वस्त्रअलंकार, पादुका पूजन होईल यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दुपारी भजन प्रवचन व हरिपाठ होईल. सायंकाळी सात ते नऊ ह भ प विजय महाराज जगताप यांचे कीर्तन, रात्री दहा ते अकरा ग्रामदैवत श्री भैरवनाथ पालखी मिरवणूक, रात्री अकरा नंतर श्रीराम कलापथक पवळेवाडी यांचे भारुडा चा कार्यक्रम सादर होणार आहे. लाखो भाविक श्रद्धेने येथे येतात नवसाला पावणारा व संकट मोचक स्वयंभू नारायण जागृत देवस्थान असल्याने आपले नवस पूर्ण झाल्यानंतर भरभरून, सढळ हाताने देवस्थानास देणगी देतात.
पायी चालत येणार भक्तांसाठी कोळवण ते भालगुडी हे पाच किलोमीटर अंतराकरिता मोफत वाहनाची व्यवस्था उद्योजक नितीन साठे व मा. पंचायत समिती सदस्य सचिन साठे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आमदार शंकर मांडेकर यांच्यामार्फत भाविकांसाठी मोफत खिचडी( फराळ) वाटप करण्यात येणार आहे. भोर, राजगड, मुळशी चे आमदार शंकर मांडेकर यांचा भालगुडी ग्रामस्थ कडून भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती भालगुडीचे सरपंच संतोष शंकर साठे यांनी दिली तसेच यात्रा काळात भाविकांनी शिस्तीत श्रींचे दर्शन घ्यावे, घाई, गडबड, गोंधळ करू नये याकरिता पौड पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.





