Amruta Fadnavis : “देवेंद्र यांच्या मेहनतीला यश मिळाले” – अमृता फडणवीस

Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा आमदार झाले आणि आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. ही माझ्यासाठी आनंदाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. मला खूप आनंद होत आहे की, त्यांची जी मेहनत आहे, त्याला यश मिळाले आहे.
महायुती आता एकत्रित आहे आणि पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाटचाल आजपासून चालू केली आहे, याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.
राज्याच्या विधानासभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसांनी महायुतीचा महाशपथविधी सोहळा पार पडला. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमृता फडणवीस म्हणाल्या, फडणवीसांचे जीवन संघर्षाचे राहिले आहे. संघर्ष करताना मी त्यांना जवळून पाहिले आहे. त्यांची जी जिद्द आहे, काही करायचं हे जेव्हा ते ठरवतात, तेव्हा ते करून दाखवतात. जिद्द आणि चिकाटीमुळे आज फडणवीस या ठिकाणी आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजना सरकारने आणली आहे.
त्यामुळे एक महिला म्हणून तुम्हाला वाटते की, महायुतीने मंत्रिमंडळात जास्तीत जास्त महिलांना संधी दिली पाहिजे. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, लाडकी बहीण ही एक चांगली योजना आहे.
राज्यातील लाखो महिला महायुतीसोबत जोडल्या गेल्या आहेत. राज्य सराकरने महिलांसाठीही विधेयक आणले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





