‘देवेंद्रभाऊ तुमच्या पक्षातील वाह्यात लोकांना आवरा..’; सुषमा अंधारेंची खोचक टीका

मुंबई – एका भाजपा आमदाराच्या भाषणाचा संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना, पक्षांतर्गत एकाकी पडण्याचे कारण सांगितले आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगलीमध्ये आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चात थेट पोलिसांनाच इशारा दिला आहे.
लव्ह जिहादच्या मुद्दयावर बोलताना, सरकार हिंदूंचे आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, मी निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो, असेही ते म्हणाले.
यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करून फडणवीस यांना अडचणीत आणले आहे. पोलीस आमचे काही वाकडे करू शकणार नाहीत. आमचा बॉस (फडणवीस) सागर बंगल्यावर बसतो, असे ते एकदा म्हणाले होते तर, पोलीस मला काही करू शकणार नाही.पोलीस काय करणार आहेत, ते फक्त आमचे व्हिडीओ बनवतील आणि घरी जाऊन बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात काय कराल? असेही ते म्हणाले होते.
याच अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांचा सांगलीतील व्हिडीओची लिंक शेअर करत, फडणवीस यांना सल्ला दिला आहे. देवेंद्रभाऊ, पक्षांतर्गत तुम्ही एकाकी पडण्याचे आणि महाराष्ट्रात तुमच्याबद्दल कमालीची नकारात्मकता वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही वाढवलेली शाऊटिंग ब्रिगेड हे आहे, असे सांगतानाच, राणे, नवनीत आणि रवी राणा, चित्रा वाघ अशा वाह्यात लोकांना आवरण्यास त्यांनी सांगितले आहे.





