Devendra Fadnavis : गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

Devendra Fadnavis : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
या कामांसाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७ चा शुभारंभ तसेच सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प या कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागातील सामूहिक शक्तीला चालना देऊन गावांच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, हे जलयुक्त शिवार अभियानाने सिद्ध केले आहे.
याच अनुभवातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केले. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
अभियानामुळे गावांमध्ये रस्ते, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही यंत्रणा, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींसह अंतिम १२ ग्रामपंचायतींना स्वतः भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी करणार असल्याचेही मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. शासनाने दुष्काळ असलेल्या तालुक्यात १२ प्रकारच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. आगामी काळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेण्यात येतील.
पाण्याचा काटकसरीने वापर करा
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. माणसे आणि जनावरांसाठी पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देऊन रब्बी हंगामासाठी योग्य नियोजन करावे. गाव तलावांमधील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे आणि जलतारा संरचना मोठ्या प्रमाणात उभारणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. या कामांसाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.






