“अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज लोकांवर…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींवर निशाणा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात त्यांना खासदारकी गमवावी लागली आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरले. त्यांच्या विधानानंतर सध्या राज्यातले वातावरण तापले आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ शिंदे गट आणि भाजपने “गौरव यात्रा’ काढली. या यात्रेतून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ‘जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणत आहे, अरे जरा शरम करा’, अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्र सोडले.
देवेंद्र फडणवीसांनी, ‘गौरव यात्रे’त राहुल गांधींच्या सवारकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले,“जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतायत. अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही मला लाज वाटते. कारण त्यांची तेवढी पात्रता नाही. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाहीत. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता, त्या पक्षाच्या नेत्यांनीदेखील सावरकरांचा गौरव केला. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनीही सावरकरांचा गौरव केला.”असे म्हणत त्यांनी टीका केली.
“तुम्ही कुठले कालचे आलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवर म्हणता, पण दुर्दैव एक अजून आहे, ते माफीवीर म्हणतायत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसले आहेत. खरं म्हणजे, ही इतकी शरमेची गोष्ट आहे की, काँग्रेस दररोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे”, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचावर टीका केली.
पुढे बोलताना, “उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते, अशाप्रकारचा एक अंक काढला. तेव्हाही उद्धव ठाकरे त्यांचा (काँग्रेस) निषेध करू शकले नाहीत. कारण खुर्ची महत्त्वाची होती. आताही जेव्हा सावरकरांचा अपमान होतो, तेव्हा ‘आम्हाला हे चालणार नाही’, ‘आम्हाला हे चालणार नाही” असं म्हणतात. पण हे सगळं चालूच आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली.





