“फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले”

मुंबई – रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोस्वामी यांच्या अटकेनंतर अनेक बडे नेते आपली भूमिका मांडत आहेत. यावेळी काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आरोप केला आहे.
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात पुरावे नसताना देखील चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांची करोनावर मात; रुग्णालयातून आज मिळाला डिस्चार्ज
विरोधी पक्षात असताना आम्ही हे सर्व बघितलं आहे. त्यावेळी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. नाईक कुटुंबावर प्रचंड दहशत होती. गेली दोन वर्ष हा परिवार संघर्ष करत होता. दोन वर्षानंतर नाईक कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. ही कारवाई दिवंगत अन्वय नाईक यांना श्रद्धांजली आहे, असेही काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपाकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. निषेध आंदोलनं करण्यात येत आहेत.





