Pune Hit and Run Case: आरोपी मुलाला बर्गर, पिझ्झा खाण्यास देणाऱ्या पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करणार – देवेंद्र फडणवीस

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतलेली नाही. पहिल्या दिवसांपासून तपास कायदेशीर आणि सर्व बाबी तपासून केला आहे. गंभीर गुन्हा केल्याप्रकरणी मुलाविरुद्ध कलम लावण्यात आले आहे. अपघात प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येथे सांगितले.
पोलीस आयुक्त म्हणाले, कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अपघातानंतर पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. अपघात करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला १४ दिवस निरीक्षणगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पोलिसांकडून दाखल केलेले दोन्ही अर्ज फेटाळले. या निर्णयाविरोधात सत्र न्यायालायत दाद मागण्यात आली आहे, त्याला न्यायालयाने काही अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला. मात्र, पोलिसांनी मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
– मद्याचे बिल तब्बल ४८ हजार रु.
मुलगा मित्रांसोबत मद्यपान करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे. तसेच त्याने ऑनलाइन केलेले पेमेंटही प्राप्त झाले आहे. त्याने दोन्ही बारमध्ये तब्बल ४८ हजाराचे उंची मद्य आणि खाद्यपदार्थ खरेदी केल्याचे बिलावरुन स्पष्ट झाले आहे.
दैनिक “प्रभात’च्या वृत्तावर गृहमंत्री फडणवीस म्हणाले…
“आरोपी मुलाला बर्गर, पिझ्झा खाण्यास दिल्याचा पोलिसांवर आरोप आहे. या दोन्ही बाबींची आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून निर्णय घेतला जाईल. असे काही जर निदर्शनास आले तर पोलिसांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल. पोलीस ठाण्यात कोण होते, कोण नाही यापेक्षा पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली, हे महत्त्वाचे आहे.
यामध्ये कोणालाही सोडले जाणार नाही नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा, तर मृताच्या नातेवाईकांना वाईट वागणूक’ असे वृत्त दैनिक “प्रभात’ने सर्वप्रथम दिले होते. या वृत्ताची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पाठोपाठ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.





