अखेर शिक्कामोर्तब ! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; कोअर कमिटीच्या बैठकीत मंजुरी

Devendra Fadnavis new CM । राज्यातील वैधानसभा निवडणुकीच्या निकालाला १२ दिवस उलटून गेल्यानंतर अखेर राज्यात महायुतीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोअर कमिटीच्या नेत्यांची मंजुरी Devendra Fadnavis new CM ।
आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोअर कमिटीतील सर्व नेत्यांनी मंजुरी दिली आहे. फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यावर एकमत झाले आहे.
उद्या आझाद मैदानावर होणार शपथविधी Devendra Fadnavis new CM ।
या निर्णयानंतर आता देवेंद्र फडणवीस आपल्या समर्थक आमदारांच्या नावांसह महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता महायुतीचे नेते राजभवनावर जातील. महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे जागा मिळाल्या, त्यावरून पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे मानले जात होते. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत. यापूर्वीही ते मुख्यमंत्री राहिले आहेत. एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना 2019 मध्येही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, मात्र दोनच दिवसांनी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
उद्या फक्त मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार?
उद्या आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. घटकपक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
हेही वाचा
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार? गृहखात्याऐवजी दोन महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता





