Devendra Fadnavis : मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना घेराव, बॉटल फेकल्या..; CM फडणवीस म्हणाले….

Devendra Fadnavis । Supriya Sule । Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरील त्यांच्या आमरण उपोषणाचा आजच तिसरा दिवस आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलनकांची संख्या वाढलेली आहे. राज्याच्या कानाकोऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे.
अश्यातच आता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाल्या. या भेटीत त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मात्र, यावेळी सुप्रिया सुळे या आझाद मैदानावरून निघत असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार घडला. यावेळी सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी देखील गेल्याच्या पाहायला मिळाले.
तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असाही आरोप केला.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, असं करण योग्य नाही. कुठलेही नेते तिथे गेल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. घोषणाबाजी करणं बाटल्या फेकणं योग्य नाही. हुडदंगबाजी करुन काहीच मिळणार नाही.
आम्ही मराठा समाजासाठी हिताचे निर्णय घेतले आहेत. मी आणि एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिले. मराठा समाजाचे लोक आरक्षणाचा लाभ घेत आहे असं फडणवीस म्हणाले आहे.





