Devendra Fadnavis : महाराष्ट्र होणार रेल्वे फाटक मुक्त; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रस्ता उड्डाण पूल तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

Devendra Fadnavis : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रस्ता उड्डाण पूल तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी २१ हजार लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, त्यापैकी १० हजारपेक्षा जास्त दळणवळण असलेल्या १२१ फाटकांसोबतच इतरही १४५ रेल्वेवरील पुलांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे.
हे काम येत्या तीन वर्षांत महारेलतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामासाठी महारेलची स्थापना केल्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे. नागपूरसह मुंबईतील अतिशय कठीण पुलांच्या बांधकामांचे नियोजनबद्ध काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले आहे. महारेलने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, यासाठी पेटंटसुद्धा मिळविले आहे.
कामाची गती व कमी खर्चात कामाचा दर्जा राखत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. नागपूर शहराच्या तसेच रस्त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या असून, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. त्यामुळे सामाजिक व आर्थिक विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाण पुलासोबतच येथील व्यावसायिकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसेच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयांच्या खर्चापैकी ४० कोटी रुपयांचा निधी एनएचएआयतर्फे देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
पूर्व नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या असून, कचऱ्यापासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरू होत आहे. महारेलतर्फे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, ती अत्यंत जलद गतीने (Devendra Fadnavis) पूर्ण होत आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.






