Devendra Fadnavis : वर्षभरात देशात झालेल्या परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा 40 टक्के हिस्सा; मुख्यमंत्री फडणवीसांकडून आकडेवारी जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात आहेत अशी टीका सतत महायुती सरकारवर केली जात आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले देशाने वर्षभरात आकर्षित केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. तसेच, गेल्या वर्षी महाराष्ट्राने आकर्षित केलेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा यंदा राज्यात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“महाराष्ट्रात गेल्या वर्षात झालेल्या गुंतवणुकीशी तुलना केली तर यावर्षी त्यापेक्षा ३२ टक्के अधिक गुंतवणूक आली आहे. या शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या ९ महिन्यातच मोडला होता. या विक्रमी कामगिरीसाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्यात गेल्या १० वर्षांत झालेली गुंतवणूक
२०१५-१६ : ६१,४८२ कोटी रुपये
२०१७-१७ : १,३१,९८० कोटी रुपये
२०१७-१८ : ८६,२४४ कोटी रुपये
२०२८-१९ : ५७,१३९ कोटी रुपये
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी रुपये
२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी रुपये
२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी रुपये
२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी रुपये
२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी रुपये
२०२४-२५ : १,६४,८७५ कोटी रुपये





