वेळ आली तर वरिष्ठांशी बोलू मात्र ओबीसींच्या..” देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही हीच भूमिका आहे. ओबीसींच्या हक्काचे आणि आम्हाला संरक्षण करावेच लागेल आणि मुख्यमंत्र्यांचीही तीच भूमिका असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसींमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ग्वाही दिली आहे.
भारतीय जनता पार्टी जोपर्यंत राज्यातील या सरकारमध्ये आहे तोपर्यंत आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. जर ओबीसींना संरक्षण देता येत नाही असे वाटले आणि तशी वेळ आली तर आपण स्वत: आपल्या वरिष्ठांशी बोलू. मात्र ओबीसींच्या हिताची काळजी घेतली जाईल असे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि राज्यातील एक मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
त्यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की त्यांनी संयम ठेवावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे व सरकारच्या भूमिकेवर त्यांचे जे आक्षेप असतील ते त्यांनी मांडावेत. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण त्यात बदल करू. आवश्यक असेल तेथे सुधारणा करू मात्र कोणावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.
काय म्हणाले फडणवीस
फडणवीस म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत आता जो काही निर्णय झाला आहे तो काही सरसकट निर्णय नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सहजपणे प्रमाणपत्र मिळावे याबाबतचा तो निर्णय आहे. प्रसारमाध्यमांवर जे काही दाखवले जाते आहे किंवा जी काही संख्या सांगितली जाते आहे त्यावर ओबीसी आणि मराठे या दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या प्रतिक्रिया थांबल्या पाहिजेत. दोन्ही समाजांच्या संदर्भात सरकारची भूमिका अगदी संतुलित अशी आहे. मराठा आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरूझाली असून कायदेशीर प्रक्रियेद्वारेच त्यांना आरक्षण दिले जाणार आहे. मागासवर्ग आयोगही कार्यवाही करत आहे त्यामुळे सगळ्यांनीच संयम बाळगला पाहिजे असे फडणवीस यांनी नमूद केले.





