Praniti Shinde : ‘देवेंद्र फडणवीस रेकॉर्डवर खोटे बोलले’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Praniti Shinde – काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी परभणी येथील हिंसाचार व बीड येथील सरपंच हत्याकांडावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेकॉर्डवर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे. बीडच्या संतोष देशमुख प्रकरणात स्वतः फडणवीस व सत्ताधारी पक्षाने पोलिसांवर मोठा दबाव टाकला. तर परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट असताना फडणवीस विधानसभेत रेकॉर्डवर खोटे बोलले, असे त्या म्हणाल्या.
प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकरणी धादांत खोटे बोलण्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्या मुलीने मला घराबाहेर पडण्यास भीती वाटत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिलाही संरक्षणाची गरज आहे. कारण हे लोक मनात डोखू ठेवून पाळत ठेवून असे करत आहेत. ते महिलांनाही सोडत नाहीत अशी प्रचंड भीती सध्या या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
प्रणिती पुढे म्हणाल्या, संतोष देशमुख हे दोनवेळा आदर्श सरपंच ठरले होते. त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील 3 संशयित आरोपी अद्यापही फरार आहेत. पण त्यांना अटक करण्यासाठी सरकार विशेषतः गृह खात्याकडून कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. या हत्याकांडाचा मुद्दा विधानसभेसह संसदेतही उठवण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण इथपर्यंत तरी पोहोचले. अन्यथा सरकारकडून हे सर्व प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला होता.
सरकारच्या विभागांत समन्वय नाही
सरकारकडून बीडच नव्हे तर परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे प्रकरणही दाबण्याचा प्रयत्न झाला. सूर्यवंशी यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाला होता. तशी गोष्ट शवविच्छेदन अहवालातून स्पष्टही झाली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंबंधी विधानसभेत रेकॉर्डवर खोटे बोलले. सोमनाथ यांचा मृत्यू मारहाणीमुळे नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे सरकारच्या विभागांत कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्ट होते.





