Satara | देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातील नेते

सातारा, – विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. या निवडीचा साताऱ्यामध्ये जल्लोष करण्यात आला. देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातील नेते आहे महाराष्ट्राचा विकास त्यांच्याच हाती सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली आहे
सत्ता स्थापनेच्या हालचाली आता 24 तासावर येऊन ठेपल्या आहेत.
भाजपच्या बैठकीमध्ये विधिमंडळ नेतेपदी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले पक्ष निरीक्षक विजय रूपाणी व निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले. त्यामुळे उद्या (गुरुवारी) सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथविधी घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विसावा नाका येथील भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरूवून आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ,सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहराध्यक्ष विकास गोसावी इत्यादी यावेळी उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी अधिकृतरित्या शपथ घेत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या विकासाची पुढील वाटचाल देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीच्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूतरित्या होत राहील याचा आम्हाला विश्वास आहे.





