महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांना ‘महिलांच्या मनातील मुख्यमंत्री’ म्हटल्यावरून चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल टोला लगावला. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदलाबदली करत असतो, असे ते म्हणाले. नेमके फडणवीस काय म्हणाले? “खरं तर आपल्याला माहितीच आहे की मी आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही आदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, तर कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो, तर कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी ते भाषण करणार आहेत. आणि त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते सेफ असतं, कारण ते परत करतात आणि मला पुन्हा मुख्यमंत्री करतात. हे मला माहिती असल्यामुळे मी रिस्क घ्यायला मागे-पुढे पाहिलेलं नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या दौऱ्याची टिंगल केल्यावर फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा घराबाहेर पडले, त्याचा आनंद आहे. हे चांगलं आहे, विरोधी पक्षांचं ते कामच आहे. पहिल्यांदा उद्धवजी घराबाहेर पडले आहेत, याचा मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वीच सांगितलं आहे, विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा, अन् हजार रुपये मिळवा.” फडणवीसांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे गट आणि फडणवीस यांच्यातील समन्वय दाखवणाऱ्या या मिश्किल शैलीने ठाकरे गटाला टार्गेट केल्याने विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.