Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला ! ‘या’ अधिकाऱ्याची केली बदली
अवघ्या तीन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली होती.

Devendra Fadnavis : राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा रोष आणि रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची पदावरून बदली करण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यातील स्पर्धा परीक्षेचे वातावरण कमालीचे तापले होते. पुणे, कोल्हापूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या पेपरफुटी प्रकरणात एमपीएससी प्रशासनातील अंतर्गत घटकांचाच सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत विद्यार्थ्यांनी थेट आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती.
याच असंतोषातून गेल्या महिन्यात नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महेंद्र हरपाळकर यांना गाठून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. या घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या कृतीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत लोकशाहीत अशा पद्धतीचे कृत्य संस्कृतीला धरून नसून, चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढायला हवा अशी भूमिका मांडली होती.
दरम्यान, अवघ्या तीन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली होती. त्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हरपाळकर यांच्या बदलीबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) दिले होते. प्रशासनाने अखेर आदेश जारी करत हरपाळकर यांची उचलबांगडी केली असून, आता या प्रकरणाची पाळेमुळे नेमकी कुठपर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






