Devendra Fadnavis : जेएनयूमधील कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले उदघाटन

नवी दिल्ली : मराठी भाषेने आपल्या संपूर्ण भारताला समृद्ध केले आहे. आजही मराठी साहित्य, मराठी नाट्यसृष्टी ही देशातील सर्वोत्तम आहे. देशामध्ये ज्याला अलिकडच्या काळात थिएटर म्हणतात, ते कुठल्या एका भाषेने टिकवलंच नाहीतर समृद्ध केले असेल तर त्या भाषेचे नाव मराठी भाषा आहे. देशामध्ये सर्वजण ही गोष्ट मान्य करतात. अशा या मराठीवर सगळीकडे संशोधन झाले पाहिजे. मराठी ही अभिजात भाषा झाली असल्यामुळे सगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधन झाले पाहिजे, याकरता अभ्यास केंद्र याठिकाणी सुरू झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) महाराष्ट्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेवटी भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषा हे विवादाचे माध्यम होऊच शकत नाही. भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहचतो.
मातृभाषा ही महत्त्वाची आहेच, प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान, स्वाभिमान आहे. तसेच मराठीचा जो आग्रह आहे, तो स्वाभाविक आणि योग्य आहे. मराठीचा अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो. इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, त्यावेळी कुठेतरी दु:ख होतं, असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
जेएनयूच्या विद्यार्थ्यांची निदर्शने…
जेएनयूमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातील विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन केले. जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस गो बॅकच्या म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तिरस्कार पसरवत आहेत. त्यांच्या राजकारणामुळे तिरस्कार पसरतो आहे. त्यामुळे आम्ही निदर्शने करत आहोत. जेएनयूसारख्या जागेत अशा लोकांना स्थान नाही. तिरस्कार पसरवणाऱ्या, समाजात विष कालवणाऱ्या लोकांना जेएनयूमध्ये स्थान नाही, असे आंदोलन करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.





