Maharashtra Cabinet Expansion : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 38 आमदारांना एक तर पंकजा मुंडेंना वेगळा न्याय…

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज नागपुरात राज भवनात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. आज एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
पंकजा मुंडेंना वेगळा न्याय
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज एकूण 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी यात फक्त पंकजा मुंडे यांच्यासाठीच वेगळा न्याय लावण्यात आला आहे.पंकजा मुंडे या विधानपरिषदेतून मंत्री झालेल्या आमदार आहेत. तर उरलेले सगळे 38 मंत्री हे विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आहेत. तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही बहीण-भाऊही मंत्रिमंडळात असणार आहेत. बहीण-भाऊ एकाच मंत्रिमंडळात असण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ आहे.
पंकजा मुंडेबद्दल बोलायचे झाल्यास 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरवलं गेलं, पण लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. यानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेण्यात आले. पंकजा मुंडे या 2014 ते 2019 फडणवीस सरकारच्या काळात महिला व बाल कल्याण मंत्री होत्या.





