सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामे रखडली – शितोळे

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती तेव्हा विविध विकासकामे मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा, घरगुती गॅस लाइन, रस्ते आदी कामे मंजूर होती. परंतु सत्ताधारी भाजपाने या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील बहुतांशी विकासकामे पाच वर्षे पूर्ण होऊनही पूर्ण झाली नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी केले आहेत.
दै. प्रभातच्या कार्यालयात गणरायाच्या आरतीसाठी आले असता त्यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधताना ते बोलत होते.
या वेळी अतुल शितोळे म्हणाले की, भाजपाने 24 तास पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण केली नाही. सध्या जी कामे सुरू आहेत ते देखील तकलादू स्वरूपाची आहेत. 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू होण्यापूर्वीच सांगवी येथील व्हॉल्व ना दुरुस्त झाल्याने सांगवी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. स्मार्ट सिटीअंतर्गत संपूर्ण शहराचा विकास करणे अपेक्षित असताना जो परिसर मुळतःच विकसित आहे त्याच ठिकाणी विकासकामे केली आणि झोपडपट्टी व इतर परिसराकडे दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य नागरिक कर भरत असून देखील विकासापासून वंचित आहे.
राष्ट्रवादीच्या काळात घरोघरी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी काम मंजूर करून घेतले. त्या कामाला सुरूवात देखील झाली परंतु अद्याप संपूर्ण शहरात गॅसपाइपलाइन पूर्ण झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सांगवी परिसरात गॅसची मेन पाइपलाइन आली आहे. परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी ठेकेदारांना त्रास दिल्याने कंपनीने काम अर्धवट सोडले ती योजना अजून पूर्ण झाली नाही. आगामी महापालिकेत मतदार राष्ट्रवादीला मतदान करून शंभरपेक्षा अधिक उमेदवार निवडून देईल. कारण भाजपाच्या काळात आश्वासनांचा पाऊस पडला पण कामे कोणतीच पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे शहराचा विकास राष्ट्रवादीच करू शकते. त्यामुळे महापालिकेत या वेळेस राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, असा विश्वास शितोळे यांनी व्यक्त केला.





