विकासकामे हीच सुनील कांंबळेंची ओळख : राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे – मागील पाच वर्षांत भाजपकडून शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून, मेट्रो, पीएमपी सक्षमीकरण, नदी संवर्धन, शहरातील स्मार्ट रस्ते, ई- बस, अशा अनेक कामांचा समावेश आहे. त्यासोबतच कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील अनेक रखडलेले प्रश्न मागील पाच वर्षांत स्थानिक पातळीवर राज्य शासनाच्या माध्यमातून आमदार सुनील कांबळे यांनीही मार्गी लावले आहेत. त्यामुळे यंदाही कॅन्टोन्मेंटमध्ये महायुतीलाच विजय मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार आमदार कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) समवेत सर्व मित्रपक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जात आहे आणि याच मुद्द्यावर नागरिक मला पुन्हा संधी देतील. मागील निवडणुकीत मताधिक्य कमी असले, तरी या निवडणुकीत आपण मोठ्या फरकाने विजयी होणार असल्याचा विश्वासही या वेळी कांबळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी कांबळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग १६ व १७ भागांतील निवडुंग विठोबा मंदिर, आझाद आळी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. माजी सभागृह नेते गणेश बीडकर, दक्षिण कन्नडाचे भाजपा खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, राष्ट्रवादीचे असंघटित केमिस्ट आघाडीचे अध्यक्ष विनोद काळोखे, नेते सागर पवार, कॅन्टोन्मेंट भाजपाचे दिलीप मामा बहिरट, पुरुषोत्तम पिल्ले आण्णा, मांगीलाल शर्मा आदींसह महायुती मधील मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





