जागेअभावी “आयटीनगरी’तील विकास प्रकल्प रखडले – बुचडे

पिंपरी – आयटी पार्कमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कचरा, पाणी, सांडपाणी, रस्ते असे अनेक मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जागेची अडचण येत आहे. त्यामुळे कचरा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प किंवा जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. याकरिता सरकारने गावच्या प्रस्तावित विकासकामांना शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे हिंजवडी माण गटाचे अध्यक्ष समीर बुचडे यांनी केली.
दै. प्रभातच्या पिंपरी कार्यालयात श्रींच्या आरतीनिमित्त ते उपस्थित राहिले होते. या वेळी त्यांनी “डिजिटल प्रभात’शी संवाद साधला. ते म्हणाले, ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे त्या पटीत सुविधा पुरविण्यास या भागांतील ग्रामपंचायतीवर ताण येत आहे. कुठलाही प्रकल्प गावपातळीवर उभा करायचा म्हटला की जागेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आयटी परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्रामपंचायतीला निधी कमी प्रमाणात असल्याने प्रकल्प उभारण्यास मर्यादा येतात. मात्र, तरीही बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या वारंवार जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाशी बैठका घेऊन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातून काही प्रमाणात प्रश्न सुटले देखील आहेत. परंतु विकासकामांना जागा ही महत्त्वाची समस्या सर्वांपुढे उभी राहिली आहे.





