प्रभात वृत्तसेवा पुणे – पीएमपी आपल्या १७ बस डेपोंपैकी १० डेपो पीपीपी तत्त्वावर विकसित करणार आहे. त्यातून प्रवाशांना चांगली व्यवस्था आणि पीएमपीला उत्पन मिळेल अशी माहिती पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिली.पुणे महानगर परिवहन महामंडाळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर देवरे यांनी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. बैठकीत पीएमपीच्या उत्पन्न वाढीवर चर्चा झाली. शहरात पीएमपीचे साडेतीन हजार बसथांबे आहेत. त्यापैकी १ हजार ७०० थांब्यांच्या शेडवर कोणत्याही जाहिरात नाहीत. या थांब्यांवर जाहिरात लावून तेथूनही उत्पन्न वाढविण्यात येणार आहे.प्रवाशांच्या सोयी-सुविधेसाठी पीएमपीकडून डेपोंचा विकास करण्याचा निर्णय पूर्वीच झाला होता. मात्र, या डेपोंचा विकास करणाऱ्यांना ३० वर्षांचा करार करावा लागणार होता. यामुळे डेपोंचा विकास करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे आता विकसकासोबत ६० वर्षांचा करार केला जाणार आहे. त्यासाठी सरकारकडे पाठपुरवा करून त्याला परवानगी घेतली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० डेपाेंचा विकास करण्याचे ठरविले आहे. पीएमपी पीपीपी तत्त्वावर न.ता.वाडी, पुणे स्टेशन, हडपसर, स्वारगेट सेंट्रल वर्कशॉप, स्वारगेट डेपो, सुतारवाडी, निगडी सेंट्रल वर्कशॉप, भोसरी डेपो, पिंपरी डेपो, निगडी भक्ती-शक्ती या डेपोंचा विकास करणार आहे. यातील सुतारवाडी, निगडी या डेपोंचा विकास आराखडा तयार केला आहे.