‘हेरिटेज’ राखूनच पुणे स्थानकाचा विकास : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

पुणे – पुणे रेल्वे स्थानकावरील “हेरिटेज’ राखूनच येथील अन्य विकासकामे केली जातील. तसेच पुणे विभागाअंतर्गत सुरू असलेले प्रकल्पांना गती देऊन ती प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शनिवारी (दि. २०) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे दौऱ्यावर आल्यावर त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली. येथील प्रश्न, विविध सुविधांची माहिती घेऊन पाहणी केली. यावेळी पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे यांनी वैष्णव यांना सर्व माहिती देत येथील अडचणी सांगितल्या.
पुणे हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे येथील विकास टप्प्याटप्प्याने केला जाईल. प्रामुख्याने उरुळी येथे मेगा टर्मिनल उभारणे, पुणे-लोणावळा तिसरी-चौथी लाइन, पुणे-अहमदनगर रेल्वेमार्ग याबाबत चर्चा झाली. त्यावर तिसऱ्या-चौथ्या लाइनसाठी राज्य सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
पुणे-नाशिक रेल्वे चर्चेच्याच टप्प्यात
रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी रेल्वे विभागाकडून सर्व मार्गाची पाहणी सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे-मुंबई दरम्यान घाट विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जाणार आहे. येथील तीव्र उतार आणि चढ कमी करून रेल्वे अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी काम केले जात आहे. तसेच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासंदर्भात देखील चर्चा सुरू असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.





