पालिका रुग्णालयात सोयीसुविधांची वानवा

रुग्णांचे हाल : कर्मचारी, डॉक्टरांची संख्या कमी
पिंपरी – रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जुनी सांगवीबरोबरच दापोडी, पिंपळे गुरव येथील नागरिक येत असल्याने सोयीसुविधांची कमतरता जाणवत आहे. साधारण दिवसाला दोनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेतात. त्यातुलनेत वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची तपासणी व्यवस्थित केली जात नाही. सर्वांत मोठी समस्या येथे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची आहे. महापालिकेने मानधन तत्त्वावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु तेही कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना रांगेत उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
महिलांची प्रसूती व कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन व इतरही ऑपरेशनसाठी भूलतज्ज्ञांची आवश्यकता आहे. परंतु अद्याप भूलतज्ज्ञाची वारंवार मागणी करूनही महापालिकेचा आरोग्यविभाग ते उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. तातडीच्या काळात महापालिकेच्या इतर हॉस्पिटलमधून भूलतज्ज्ञ बोलवावे लागत आहेत. ते वेळत उपलब्ध न झाल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळेस भूलतज्ज्ञ उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना कित्येक दिवस उपचारासाठी वाट पाहवी लागत आहे.
नाईलाजास्तव रुग्णांना वायसीएम रुग्णलयात किंवा जिल्हा रुग्णालयात अथवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे महापालिकेचा दवाखाना नुसताच नावाला आहे. त्यासाठी महापालिका लाखो रुपये खर्च करते, परंतु रुग्णांच्या दृष्टीने हा दवाखाना म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच भावना झाली आहे.
महापालिकेचे हे प्रशस्त रुग्णालय आहे. परंतु येथे दोनच डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. त्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णांना खूप मोठी प्रतीक्षा उपचारासाठी करावी लागत आहे. रुग्णांना आजाराच्या वेदना मूळतःच अधिक आणि त्यात उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्या वेदनांत वाढच होताना दिसत आहे. सध्या येथे असणारे डॉक्टर सर्व गोष्टींची उपलब्धता असल्याचे सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या संबंधी मनसेच्या राजू साळवे यांनी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना निवेदन दिले आहे. त्यात रुग्णालयात सोयीसुविधा त्वरित पुरवण्याची मागणी केली आहे.
डॉक्टरांची कमतरता
रुग्णालयात वेगवेगळे विभाग आहेत. परंतु रुग्णालयात फक्त दोनच डॉक्टर असल्याने सर्व रुग्ण एकाच ठिकाणी तपासले जात आहेत. त्यामुळे रुग्णांना रांगेत उभे राहून उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यात बालरुग्ण व गरोदर स्त्रीया, ज्येष्ठ नागरिक तसेच काही नियमित टी. बी. चे रुग्णदेखील येत असतात. त्यामुळे रुग्णांमध्ये उपचाराविषयी साशंकता निर्माण झाली आहे. आजार कोणताही असो डॉक्टर मात्र एकच अशीच अवस्था या रुग्णालयाची झाली आहे. वास्तविक पाहता प्रत्यक विभागासाठी वेगवेगळा कक्ष व डॉक्टर असणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. महापालिकेकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याची दखल घेताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
एक्सरे मशीन व सोनोग्राफी सेंटर उभारावे
रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना एक्सरे करण्यासाठी खासगी रुग्णालयात किंवा वायसीएम येथे जावे लागत आहे. तेथे मुळातच मोठी गर्दी असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच गरोदर मातांना महिन्याला सोनोग्राफी करावी लागते. त्यांची अवस्था अधीच अवघडलेली असते त्यांना अशा अवस्थेत सोनोग्राफीसाठी इतरत्र फिरावे लागत आहे. त्यामुळे एक्सरे मशीन व सोनोग्राफी सेंटर त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
हिरकणी कक्ष नसल्याने महिलांची गैरसोय
रुग्णालयात हिरकणी कक्ष नाही. त्यामुळे नवजात शिशूंना स्तनपान करण्यासाठी बालकांच्या मातांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. लहान मूल भूक लागून रडत असेल तर त्या मातेला त्याला स्तनपान गरजेचे असते. परंतु सोयीअभावी कोठेतरी आडोशाला जाऊन आपल्या बालकाची भूक भागवावी लागत आहे. त्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे रुग्णालयात एक हिरकणी कक्ष निर्माण करण्याची मागणी महिलावर्गाकडून होत आहे.
दवाखान्याची जागा अपुरी आहे. महापौर माई ढोरे यांनी रुग्णालयाची पाहणी केली आहे. त्यातील सुधारणांसाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. सध्या डॉक्टरांची संख्या चांगली आहे. ओपीडीसाठी पाच तर रात्रपाळीसाठी दोन. या ठिकाणी प्रसूतिगृह असलेल्याने डॉक्टर राउंडला गेले असता वेळ लागतो. नर्स, भूलतज्ज्ञ व पुरेसे कर्मचारी आहेत. हिरकणी कक्षाची व्यवस्था केली आहे. सोनोग्राफी व एक्सरेची व्यवस्था करण्यात आली आहे.
– डॉ. विजया आंबेडकर, वैद्यकीय अधिकारी, सांगवी रुग्णालय





