पिंपरी | ऑनलाइन पेमेंट चालेल ? अजिबात नाही

पिंपरी, {अमोल शित्र} – देश डिजिटल क्रांतीकडे झेपावला असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात अजूनही रोखीनेच व्यवहार सुरु आहे. रुग्णाने किंवा नातेवाइकाने आॅनलाइन पेमेंट चालेल का? विचारल्यावर समोरुन उत्तर येते अजिबात नाही.
रुग्णांना उपचार घेण्यासाठी अजूनही रोख शुल्क जमा करावे लागते. एकाही काऊंटरला ऑनलाइन पेमेंटची सुविधा नसल्याने रुग्णांना खिशात सुट्टे पैसे घेऊनच रुग्णालयात पाय ठेवावा लागतो. केस पेपर काढण्यापासून ते उपचार घेतल्याची बिले भरण्यापर्यंत रोख पैसे भरणे शक्य होत नसल्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे लवकरात लवकर रुग्णालयांमध्ये ऑनलाइन पेमेंटची सोय करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची शहरात एकूण ३२ दवाखाने आणि ८ मोठी रुग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे महापालिकेचे ७५० खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात येतात. यासह जिजामाता, तालेरा, भोसरी, आकुर्डी, थेरगाव तसेच मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय पर्ण क्षमतेने चालू आहे.
जिल्ह्यातील लाखो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयांमध्ये दररोज येतात. यासह उपनगरांमधील ३२ दवाखान्यांत हजारो रुग्णांवर दररोज उच्च दर्जाचे उपचार केले जातात. या रुग्णालयाच्या माध्यमातून पालिकेने वैद्यकीय यंत्रणा संक्षम केली असली तरी सर्वच रुग्णालयात व दवाखान्यांत अजूनही केस पेपर काढण्यासाठी रोख पैसे भरावे लागतात.
केस पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यातच काही रुग्णांकडे सुट्टे पैसे नसल्यास त्यांना रांगेतून बाहेर पडावे लागते. कसेबसे पैसे मिळवून पुन्हा केस पेपर काढण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते. यात रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी, रुग्णांनी वैद्यकीय व्यवस्थेवरच नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांची गरज दुय्यम ?
महापालिकेकडे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर जमा होतो. त्यातील खूप मोठा हिस्सा आॅनलाइन पेमेंटच्या माध्यमातून जमा होतो. नागरिकांनी मिळकत कर वेळेपूर्वी भरावा, यासाठी आॅनलाइन पेमेंट सुविधा, सुट्टीच्या दिवशीही भरण्याची सोय, वेळेपूर्वी भरल्यास सवलत अशा अनेक उपाययोजना पालिका स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी राबविते.
परंतु जिथे नागरिकांना गरज असते तिथे मात्र चर्चेचे गुऱ्हाळ सुरु राहते. स्वत:च्या फायद्यासाठी आॅनलाइन पेमेंट स्कीम राबविणारी महापालिका रुग्णांना मात्र सुट्ट्या पैशांसाठी पळवते. नागरिकांची पालिकेच्या दृष्टीने दुय्यम आहे का ?
पथारीवाला मोठा की पालिकेची रग्णालये ?
सध्या सर्वच क्षेत्रात ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु, महापालिकेच्या एकाही रुग्णालयात अद्याप ही सुविधा सुरु केली नाही. एकीकडे नागरिकांचा मालमत्ता कर ऑनलाइन जमा करुन घेतला जातो.
निविदा प्रक्रिया, कामाची बिले, विद्यर्थ्यांसाठी डीबीटी, कर्मचा-यांना दरमहा वेतन करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट पध्दतीचा अवलंब केला जातो.
मग, रुग्णालयात ही सुविधा का उपलब्ध करुन दिली जात नाही, असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे. जन्म-मृत्यू दाखले काढण्यासाठी सुध्दा रोख स्वरुपात पैसे घेतले जातात.
रस्त्यावरील पथारीवाले ऑनलाइन पेमेंटचा अवलंब करतो, महापालिकेला ते का शक्य नाही, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर महापालिकेच्या सर्व रुग्णालयात ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात वरिष्ठांची चर्चा झालेली आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी लागणारी प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरु आहे. लवकरच सर्व रुग्णालयात रोख स्वरुपासह ऑनलाईन पेमेंटची सुविधा ही उपलब्ध करुन दिली जाईल. – डॉ. लक्ष्मण गोफणे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी,





