satara | पराभव झाला असला तरी माणमध्ये उठावदार काम

वडूज, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघात भजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी माण मतदार संघात आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पक्ष कार्यकर्त्यांनी उठावदार काम केले आहे. काही झाले तरी उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरेच आमदार असतील, असा ठाम विश्वास माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी व्यक्त केला.
येथील नगरसेविका सौ. रेखा माळी यांचे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते सोमनाथ भोसले, माजी नगरसेवक अनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. येळगावकर म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीतील ‘आमचं ठरलय’ टीम मधून आपण एकटेच बाहेत पडलो होतो.
त्यामुळे पक्षाचे भवितव्य नक्की काय होणार? याची सर्वांना उत्सुकता होती. तर निवडणूक प्रचारात काही लोकांकडून आपणास जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले होते. या सर्वांना आपण कामातून उत्तर दिले. खटाव, माणमध्ये भाजप उमेदवारास जे मताधिक्य मिळाले त्यामध्ये जयाभाऊंचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्रिदेवी पंतप्रतिनीधी, जिल्हा
नियोजन समिती सदस्य प्रा. बंडा गोडसे यांचेही निवडणुकीत चांगले सहकार्य लाभले. तर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी शांत राहून राहून अप्रत्यक्षरित्या भाजपला सहकार्य केले. अजितदादांची भाजपशी युती असताना काही लोकांनी फारकत घेणे दुर्दैवी आहे. निवडणुकीत पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माण मधून १७५००, तर खटाव तालुक्यातून ६,०२६ मतांचे मताधिक्य मिळाले.
विशेषतः मायणी गटात प्रस्थापितांच्या विरोधात २,११५ मतांचे मताधिक्य मिळाले ही जमेची बाजू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुरू असलेल्या चांगल्या योजना, शेती पाणी योजनांसाठी दिलेला भरघोस निधी यामुळे लोकांनी भाजप उमेदवारास पसंती दिली. तर विरोधकांनी ऐनवेळी निवडणूक जातीय वळणावर नेल्याचा आरोप केला. तर लोकसभा निवडणुकीत लक्ष्मीदर्शन झाल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
युवानेते सोमनाथ भोसले म्हणाले, निवडणुकीत लोकांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या रचनात्मक विकास कामांना दुय्यम स्थान देऊन स्थानिक राजकारणाला महत्व दिले. माढा मतदार संघाची निवडणूक सोलापूर व सातारा अशी विभागली गेली. निकालाचा लोकांना भविष्यात पश्चाताप होईल. उमेदवार बदलला असता तरी यश आले नसते.
भाजप जिल्हाध्यक्ष कमी पडताहेत
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम पक्षातील जुने नवे वाद मिटवण्यास कमी पडत आहेत. त्यांनी निवडणुकीत प्रॉपर नियोजन न केल्याने काही महत्वाचे पदाधिकारी नाराज झाले होते. यापुढच्या काळात त्यांनी कामकाजात सुधारणा करावी. अन्यथा पक्ष संघटनेला गंमीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी डॉ. येळगावकर यांनी दिला.





