Chandrakant Raghuvanshi : “आम्ही दोन आमदार असूनही…”; शिंदेंच्या आमदाराला अश्रू अनावर, दोन मंत्र्यांसमोर नेमकं काय घडलं?
Chandrakant Raghuvanshi : नंदुरबार येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाच्या सूत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Chandrakant Raghuvanshi : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असले तरी विविध मुद्द्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे चित्र अनेकदा समोर आले आहे. स्थानिक पातळीवरही महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येते. आता नंदुरबारमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर कार्यक्रमातच नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, आपली व्यथा मांडताना ते भावूक झाले आणि मंत्र्यांसमोरच त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
नंदुरबार येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाच्या सूत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. कार्यकर्त्यांची कामे कशी करायची, असा सवाल करत रघुवंशी यांनी पक्षाला निधी वाटपाचे स्वतंत्र निकष असावेत, अशी मागणी केली.
‘शिवसेनेला न्याय देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती’
निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, “कार्यकर्ता कोणत्याही नेत्याच्या घरी जेवायला येत नाही. आपल्या गावाची कामे झाली पाहिजेत, अशी त्याची अपेक्षा असते. आम्ही दोन आमदार असूनही शिवसेनेला न्याय देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.”
नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेकडे विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी असे दोन आमदार आहेत. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपासाठी निश्चित करण्यात आलेल्या सूत्रामुळे दोन्ही आमदारांच्या वाट्याला अत्यल्प निधी येत असल्याची खंत रघुवंशी यांनी व्यक्त केली.
‘पक्षाला निधी द्या’
निधी वाटपाच्या विद्यमान सूत्रावर बोट ठेवत रघुवंशी यांनी सांगितले की, विधानसभेच्या आमदारांना २०-२० टक्के निधी देण्याचे निकष ठरवण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार असून, त्यापैकी एक शिवसेनेचा आणि दोन भाजपचे आमदार आहेत. त्यानुसार २०-२० टक्के निधी दिला जातो, तर पालकमंत्र्यांना ३० टक्के निधी देण्याचा अधिकार आहे. उर्वरित १० टक्के निधीत इतर पक्षांचे नेते आणि पदाधिकारी येतात, असे त्यांनी सांगितले. “विधानसभेच्या आमदारांप्रमाणे पैसे न देता पक्षाला पैसे द्या,” अशी मागणी रघुवंशी यांनी मंत्र्यांसमोर केली.
निधी वाटपाच्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणीही त्यांनी केली. सध्याच्या पद्धतीमुळे पक्षाचा विस्तारही होत नसल्याचा दावा त्यांनी केला. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदाराने थेट व्यासपीठावरून व्यक्त केलेली ही नाराजी आणि त्यावेळी आलेले अश्रू यामुळे नंदुरबारमधील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.






