पुणे : पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरात देवीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2 मे रोजी दुपारी घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शिवाजी मारुती वाघवले (वय 34) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार चांद नौषाद शेख (वय 19) आणि नौषाद शादाब शेख (वय 44) यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद नौषाद शेख यांनी मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपीने मंदिराचे गेट बंद करून मूर्तीला खाली पाडले आणि विटंबना केली. या घटनेनंतर चांद शेख याचा वडील नौषाद शादाब शेख (वय 44) यांनी उपस्थित लोकांना उद्देशून “तुम हिंदू लोक आमचं काहीच करू शकत नाही” असे धमकीचे उद्गार काढल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून नागेश्वर मंदिर व मज्जीतला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत आहेत. हे कृत्य उघड होताच नागरिकांनी सदर व्यक्तीला चोप दिला. सध्या तो ससून रुग्णालयात दाखल आहे. पुढील पोलिसी प्रक्रिया सुरू असून आज पौड ग्रामस्थांकडून गाव बंदची हाक देण्यात आली आहे. बाहेरुन येणाऱ्या मुस्लिम बांधवाना मशिदीमध्ये येण्यास प्रतिबंध पौड गावामध्ये बाहेरुन येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवाना मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पौड व स्थानिक मुस्लिम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक मुस्लिम बांधव वगळता परप्रांतीय मुस्लिम बांधव, व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लिम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधवांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच मशीदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरून येणारे बांधव जास्त असल्याने गावाची कायदा सुव्यवस्था व शांतता यास अडथळा निर्माण होत आहे. तरी या ठिकाणी फक्त स्थानिक मुस्लिम बांधवच प्रार्थना करतील. याची इतर परप्रांतीय व पंचक्रोशी मधील मुस्लिम बांधवांनी नोंद घ्यावी.