Eknath Shinde : लाडक्या बहिणीसाठी ‘भाऊ’ धावून आला! एकनाथ शिंदेनी ‘त्या’ महिलेला स्वतःच्या विमानाने मुंबईला आणलं

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपली संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वशैली दाखवून दिली आहे. जळगाव दौऱ्यावर असताना एका गंभीर रुग्ण महिलेच्या मदतीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत, तिला खासगी विमानाने थेट मुंबईत उपचारासाठी नेले.
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील शितल बोरडे नावाची महिला गेल्या आठ वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होती. अखेर तिच्यासाठी किडनी उपलब्ध झाली आणि तातडीने ट्रान्सप्लांटसाठी मुंबई गाठण्याची आवश्यकता निर्माण झाली. मात्र नियोजित विमान निघून गेल्यामुळे ती वेळेत मुंबईला पोहोचू शकत नव्हती. या परिस्थितीत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली.
उपमुख्यमंत्र्यांची तात्काळ मदत
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोणतीही वेळ न घालवता शितल बोरडे यांना स्वतःच्या विमानात जागा देत तात्काळ मुंबईला रवाना केले. मुंबईत पोहोचताच रुग्णालयात नेण्यासाठी आधीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वेळेवर रुग्ण महिला उपचारासाठी दाखल झाली.
भावनिक प्रतिक्रिया आणि कौतुक
शितल बोरडे यांचा भाऊ जितेंद्र पाटील याने भावना व्यक्त करताना सांगितले, “माझी बहीण गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होती. आज जेव्हा किडनी उपलब्ध झाली तेव्हा आम्ही आनंदित होतो, पण विमान चुकल्यामुळे निराश झालो होतो. अशा क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवासारखे धावून आले.”
त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदेंच्या या मदतीचे कौतुक करत “ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की एकनाथ शिंदे हे सामान्य लोकांचे खरे नेता आहेत” असे म्हटले.
नेहमीच माणसांच्या सेवेसाठी तत्पर
ही पहिली वेळ नाही की शिंदे यांनी अशा पद्धतीने एखाद्या गरजवंत नागरिकासाठी पुढाकार घेतला आहे. आधीही त्यांनी हभप मोरे महाराजांच्या कुटुंबीयांना, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मदत केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा सुद्धा नेहमी तत्पर असते.





