“अयोध्येतील ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो.. कारसेवेत असल्याचा अभिमान” देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं

मुंबई – अयोध्येतील कलंकित ढाचा पडला तेव्हा मी तिथेच होतो. कारसेवेत असल्याचा मला अभिमान आहे. त्यावेळी इतर लोक कुठे लपले होते त्यावर मी बोलणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाला अवघे काही दिवसच उरलेत. देशभरात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यावरून सत्ताधारी व विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना फडणवीस यांनी उपरोक्त विधान केले आहे. ते म्हणाले, मी तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो याचा मला अभिमान आहे. राम मंदिर देशात तयार होत आहे. हे पर्व सगळ्या देशाचे आहे. प्रत्येक हिंदू माणसाचे आहे. देशात भारतीय संस्कृती मानणाऱ्या प्रत्येकाचे मंदिर आहे. ज्याला वाटते आहे मी हिंदू आहे, ज्याला वाटते मी भारतीय आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पर्व आहे, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, मंत्री गिरीश महाजन, श्वेता शालिनी व अन्य मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी राम मंदिरावरून राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांनाही टोला हाणला. अयोध्येतील कलंकित ढाचा पाडण्यात आला इतर लोक कुठे लपले होते त्याच्यावर कशाला बोलायचे? मी काही लोकांची पर्वा करत नाही. कारसेवा करण्याच्या वेळी हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाही. आम्ही राम मंदिरासाठी तुरुंगवास भोगला. आता काही जण जळतात, कारण ते तेव्हा घाबरून घरात बसले होते, असे फडणवीस म्हणाले.
बाबराने लावलेला कलंक हटवला
देशात ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार होत आहे. आपल्यावर जो कलंक बाबराने लावला होता तो हटवण्याचे काम सरकार करत आहे. या देशाची आस्था असलेल्या रामाची मूर्ती मंदिरात असणार आहे. अशावेळी राजकारण करणे हे अत्यंत हीन दर्जाचे आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा सगळे मतभेद विसरुन रामापुढे हात जोडले पाहिजेत आणि संपूर्ण देश राममय कसा होईल ते पाहिले पाहिजे, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.





