“कसबा हरल्याचे पोस्टमार्टम करू” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पुणे – कोणतीही निवडणूक जिंकतो किंवा हरतो याने काही फरक पडतो, असे मी मानत नाही. मात्र, कोणत्याही निवडणुकीच्या विजयानंतर किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मूल्यमापन किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे तर “पोस्टमार्टम’ करत असतो. कसब्याचे ते आम्ही केले आहे. यापुढे योग्य काळजी घ्यायची ती घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एका बैठकीसाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर “ईडी’चे छापे पडले. त्याविषयी विचारले असता, मला याबद्दल काही माहिती नाही, माध्यमातच हे पहायला मिळाले, असे फडणवीस म्हणाले.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला. तत्काळ पंचनाम्यांचे आदेश आपण दिले, त्याची सुरूवात झाली आहे. थोडा काळ तरी त्यासाठी द्यावा लागेल. शेतकऱ्यांनी नुकसानीचा साधा फोटो जरी काढला तरी आम्ही त्याला पंचनामा मानू, असे देखील आम्ही सांगत आहोत.
मला तर विरोधी पक्षाचेही आश्चर्य वाटते आहे की, त्यांच्याकाळातील पैसे आम्ही देतोय. आता इकडे रात्रीचा पाऊस पडला तर पंचनामा झाला नाही म्हणून लगेच सकाळी ओरडतात. रात्री पडलेल्या पावसाचा सकाळी लगेच पंचनामा हा त्यांनी तरी पाहिला आहे का? अशी टीका करत, अतिवृष्टी वगैरे विषयात संवेदनशील असले पाहिजे, त्याचे राजकारण करू नये, असे फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.





