पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेच बारामतीत; पूरग्रस्तांची केली पाहणी

पुणे : जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. बारामती, दौंड, जुन्नर, खेड, शिरूर, भोर, मुळशी, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, हवेली तालुक्यांत चांगलीच दैना केली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. असं असताना आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे आज भल्या पहाटे बारामतीच्या दौऱ्यावर आहे.
बारामतीतील पूरग्रस्त ठिकाणांची अजित पवार यांच्याकडून पाहणी
अजित पवार आज भल्या पहाटे बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. अजित पवार यांनी एमआयडीसीमधील तडा गेलेल्या इमारतीची पाहणी केली. तसेच एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन इमारती शेजारी खुदाई केल्याने इमारतीला तडे गेल्याची घटना घडली आहे.
यामध्ये साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी बिल्डिंगची नावे असलेल्या इमारतीचे यामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर सध्या या इमारतीमधील कुटुंबीयांना स्थलांतर करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आले आहेत. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच परिसराची पाहणी करत असून नागरिकांकडून माहिती घेत आहेत.
बारामतीत नीरा डावा कालव्याला भगदाड
बारामती तालुक्यात पिंपळी लिमटेक येथे नीरा डावा कालव्याला भगदाड पडल्याने हे पाणी शेतीत आणि नागरी वस्तीत शिरले आहे. अवकाळीने जिल्ह्यात सुमारे २०० ते ३०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पाऊस ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचा आकडा समजू शकणार आहे.
बारामती तालुक्यात अवकाळीने दाणादाण केली आहे. शहरात ओढ्याला नदीचे स्वरूप आले होते. भोर तालुक्यात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. आंबेगाव हिरडा पिकांसह तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यात डाळिंब पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात आंबा पिकांचे नुकसान झाले आहे.
पुणे पाऊस(मिमी) 09:30 PM 25.05.2025,
दौंड 98.0
लोणावळा 76.0
बारामती 49.5
धामधरे 35.5
वडगावशेरी 34.0
निमगिरी 28.0
मालिन 27.0
हडपसर 25.0
बल्लाळवाडी 18.5
नारायणगाव 17.0
डुडुळगाव 12.5
मगरपट्टा 8.0
GIRIVAN 7.0
लवासा 6.0
राजगुरुनगर 5.5
कोरेगाव पार्क 5
भोर 5
NDA 3.5
तळेगाव 2.5
पुरंदर 0.5





