उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी अकोलेत

अकोले – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार २० सप्टेंबर रोजी अकोलेत येत असून, त्यांचेहस्ते तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन होऊन दुपारी ४ वाजता बाजारतळावर जाहीर सभा होणार आहे. लाडक्या बहिणींसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ.डाॅ.किरण लहामटे यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे आ. लहामटे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर, मा.जि.प.सदस्य कैलासराव वाकचाैरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस तालुकाध्यक्ष शरद चाैधरी, मार्केटचे सभापती भानुदास तिकांडे, नगरसेवक आरीफ शेख, डाॅ.मनोज मोरे आदी उपस्थित होते. आ. लहामटे म्हणाले की, गेली २ वर्षांनंतर उपमुख्यमंत्री पवार अकोलेत येत आहे. दोन वर्षांत अजितदादांनी तालुक्यासाठी २३०० ते २४०० कोटीचा निधी दिला आहे.
त्यांचेमुळेच तालुक्यात एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागत आहे. तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय, रंधा फॅालला पर्यटनासाठी काचेचा पूल, अकोले शहराचे सुंदर छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक, बाजारतळ सुशोभीकरण, कारखाना रोड, स्मशानभूमी, भंडारदरा येथील रिंगरोड, हरिश्चंद्रगड रस्ता, देवठाण रस्ता यासह तालुक्यातील रस्ते आदी विकासकामे मार्गी लागले आहे.
येत्या २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता उपमुख्यमंत्री पवार हे अगस्ती कारखान्याच्या हेलिपॅडवर येऊन त्यानंतर काही विकासकामाचे लोकार्पण व काही कामाचे भूमिपूजन हे जागेवरून करणार आहे. त्यानंतर ४ वाजता अकोले शहरातील बाजारतळावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी शेतकरी व लाडक्या बहिणीसाठी पवार विशेष मार्गदर्शन करणार आहे. तालुक्यातील लाडक्या बहिणी दादांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.





