खासदार जलील यांच्यासह ठेवीदार आक्रमक ! आदर्श बॅंक घोटाळा; पोलिसांनी अडवताच बॅरिकेट्स तोडून आंदोलक आयुक्तालयात घुसले

छत्रपती संभाजीनगर – ठेवीदारांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे खाणाऱ्या बँक, पतसंस्था,को. ऑप सोसायटी यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी जलील यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी ते आयुक्तालयाकडे निघाले तेव्हा पोलिसांना त्यांना अडवले. अखेर जलील यांच्यासह आंदोलक ठेवीदार आक्रमक झाले. त्यांनी बॅरिकेट्स तोडून विभागीय आयुक्तालयात प्रवेश केला. यावेळी काही चांगलाच गोंधळ उडाला.
यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सरकारला सांगू इच्छितो की, माझ्यावर आणि ह्या निष्पाप लोकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आम्हाला आंदोलन करण्यापासून तुम्ही रोखू शकणार नाही. या असहाय लोकांचे कष्टाचे पैसे त्यांना परत मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे.
आदर्श बॅंकेतील हजारो ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला. त्यानंतर शासनाकडून संबधित बॅंकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल केले तर अनेकांना अटक देखील केली. तर ठेवीदारांना लवकरच त्यांचे पैसे मिळतील, असे आश्वासन देखील नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला होता. त्याचाच जाब विचारण्यासाठी व ठेवीदारांचा पैसा नेमका कधी मिळणार अशी मागणी करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालायसमोर धरणे आ्ंदोलन करण्यात आले.
काय आहे आदर्श बॅंक घोटाळा
काही वर्षांपूर्वी राज्यात आदर्श घोटाळा गाजला होता. दरम्यान आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा २०० कोटींचा एक ‘आदर्श’ घोटाळा समोर आला आहे. नियमबाह्य कर्जवाटप करुन ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचा ठपका शहरातील आदर्श नागरी सहकारी संस्थेवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सिडको पोलीस ठाण्यात मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





