Marathwada Liberation Day: “मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार, आमदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा दिला. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र मराठवाडा निजामाच्या राजवटीत होता. तब्बल १३ महिन्यांच्या संघर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला आणि येथे तिरंगा फडकला. या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेले बलिदान, कारागृहातील अत्याचार आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून केलेला संघर्ष यांचे स्मरण करत मुख्यमंत्र्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मानाचा मुजरा केला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
मराठवाड्यावर सातत्याने दुष्काळाचे संकट येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाही पावसाच्या खंडामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे नमूद केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या; मात्र त्यानंतर मोठा पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना आश्वस्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ऑक्टोबर महिन्यातील पीक नुकसानीचे पंचनामे लवकरच सुरू करण्यात येतील आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारची मदत पोहोचवली जाईल, असे फडणविसांनी स्पष्ट केले आहे.
LIVE | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण व हुतात्म्यांना अभिवादन
🕘 स. ९.१३ वा | १७-९-२०२६📍छत्रपती संभाजीनगर#Maharashtra #MarathwadaMuktiSangram #ChhatrapatiSambhajiNagarhttps://t.co/s5PE1oeLGn
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2026
चारा आणि पाणीटंचाईसाठी नियोजन
आगामी काळात पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने विविध विकासकामांच्या माध्यमातून चारा लागवड केली असून जनावरांसाठी चारा उपलब्ध राहील, असे नियोजन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि मोफत वीज
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या दिशेनेही शासन काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृष्णा खोऱ्याचे पाणी भीमा नदीच्या माध्यमातून मराठवाड्यात आणण्यासाठी नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले. तसेच कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांना मदत आणि पाणीप्रश्नाचे कायमस्वरूपी निराकरण यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :





