गरिबांच्या बॅंक खात्यांमध्ये प्रत्येकी 7 हजार 500 रूपये जमा करा

कॉंग्रेसची मोदी सरकारकडे मागणी
नवी दिल्ली : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील गरीब आणि गरजूंना प्रत्येकी 7 हजार 500 रूपये दिले जावेत. ती रक्कम तातडीने सर्व जनधन, पेन्शन आणि पीएम-किसान खात्यांमध्ये जमा केली जावी, अशी मागणी कॉंग्रेसने मोदी सरकारकडे केली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या एका सल्लागार समितीची नुकतीच स्थापना केली. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश असणाऱ्या त्या समितीची पहिली बैठक सोमवारी येथे झाली. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार गरीब आणि गरजूंना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत पुरवण्याची मागणी करण्यात आली. सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या पुनरूज्जीवनासाठी कॉंग्रेसने तयार केलेल्या आराखड्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
तो आराखडा लवकरच मोदी सरकारकडे सादर केला जाणार आहे. शेतमालाची खरेदी आणि स्थलांतरितांच्या समस्या याविषयीही कॉंग्रेसकडून काही शिफारसी सरकारला केल्या जाणार आहेत. करोना संकट आणि त्यावर मात करण्यासाठी उचलण्यात आलेले लॉकडाऊनचे पाऊल आदींमुळे अर्थव्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी विधायक विरोधी पक्षाची भूमिका घेऊन सरकारपुढे काही प्रस्ताव मांडण्याचे कॉंग्रेसने ठरवले आहे.





