सातारा -सातारा ते मिरज या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम गतीने सुरु आहे. या कामामध्येच शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा रेल्वे स्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भागावर युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निवडक चरित्र प्रसंगाचे चित्रण करण्यात येणार आहे.
त्याबरोबरच पुण्याकडे जाणाऱ्या प्लॅटफॉर्मची लांबी 167 मीटरने वाढवणे, सोलर सिस्टिम उभारणे, पादचारी ओव्हरब्रिज, रेल्वे माल शेडचा विकास करणे आदी लोकहिताची कामे सुचवली होती. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामामध्ये या कामांचा समावेश करुन ही कामे मार्गी लावली आहेत. लवकरच या कामांची सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारा रेल्वे स्थानक नॉन सबर्बन ग्रेड 5 या दर्जाचे आहे. याठिकाणी किमान आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दर्जेदारपणे रेल्वेप्रवाशांच्या मिळण्यासाठी आम्ही नेहमीच सतर्क असतो, असे नमूद करुन खासदार भोसले यांनी म्हटले आहे की, दानवे यांना केलेल्या विनंतीनुसार कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. रेल्वे सुविधांचा प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.