भक्तिमय वातावरणात ‘संत ज्ञानेश्वर’ माऊलींच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

नेवासा (प्रतिनिधी) – ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज ‘पैस’खांब मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या पायी पालखी दिंडीचे आज (दि.२ जुलै) ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
मंगळवारी माऊलींच्या योगिनी एकादशीच्या निमित्ताने सकाळी माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या ‘पैस’खांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदन उटी लावून देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते पूजन करण्यात आले होते. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून या दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी अग्रभागी नृत्य करणारे अश्व, त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करणारे वारकरी, भजनी मंडळाचे पथक, पुष्पांनी सजविण्यात आलेला पालखी रथ, डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते.
या दिंडी सोहळयाच्या स्वागत प्रसंगी अशोक मिसाळ, काकासाहेब गंडाळ, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, डॉ.लक्ष्मण खंडाळे, सुनील वाघ, संजय सुकाळकर, दिनेश व्यवहारे, जालिंदर गवळी, मनोज पारखे, सतीश गायके, नितीन खंडाळे, राजेंद्र मापारी यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच नेवासकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





