Nagar | नगरपरिषद स्टॉल गैरव्यवहार प्रकरणी विभागीय समिती

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- शहरात विविध सण, उत्सवानिमित्त लावण्यात येणाऱ्या स्टॉलच्या गैरव्यवहाप्रकरणी संजय आरणे व संजय शेळके यांच्या खातेनिहाय चौकशीसाठी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी विभागीय समिती स्थापन केली आहे. समितीवर प्रशासकीय सेवा अधिकारी शीतल काळे, आस्थापना विभाग प्रमुख राहुल खलिपे यांची यांची नियुक्ती करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमित मुथ्था यांनी २०१९ पासून श्रीरामपूर नगर परिषदेच्यावतीने या स्टॉलच्या गैरव्यवहाराबाबत पालिका लेखापाल संजय आरणे व कर्मचारी संजय शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार केली.
२०२२ मध्ये जिल्हाधिकारीय यांच्या आदेशानुसार कोपरगावच्या मुख्याधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला. चौकशीमध्ये त्यांना कामकाजात अनियमितता दिसून आल्याचे आढळून आली.
या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पूर्वकथित अतिक्रमण अधिकारी याला पदावरून बरखास्त करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी. तसेच तत्कालीन कार्यरत अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांची माहिती कळवावी. संबंधीत कर्मचारी, अधिकारी यांच्यावर दोषारोप दाखल करावे, असे निर्देश श्रीरामपूर नगरपरिषदेस दिले.
त्यानुसार मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी विभागीय समिती स्थापन करून वरिष्ठ लिपीक संजय बबन आरणे व बांधकाम विभागातील लेबर संजय श्रीपत शेळके यांच्या खातेनिहाय चौकशीसाठी समिती स्थापन केली. त्यासाठी प्रशासकीय सेवा अधिकारी शीतल काळे, वरिष्ठ लिपीक राहुल खलिपे यांची नियुक्ती केली आहे.
चौकशी न केल्यास कारवाई
समितीने विभागीय चौकशी करून आस्थापना विभागास अहवाल सादर करण्याचे आदेश समितीस असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कामकाजात हयगय केल्यास त्यांच्यावरही महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीय नागरी अधिनियम, १९६५ व महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही या आदेशात मुख्याधिकारी यांनी दिला आहे.





