Deool Band 2: ‘देऊळबंद-2’च्या यशस्वी टीमचा ‘सूर्यदत्त’ संस्थेकडून गौरव
Deool Band 2: चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल स्नेहल व प्रवीण तरडे यांना ‘सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६'

Deool Band 2: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या गाजत असलेल्या ‘देऊळबंद-२’ या चित्रपटाच्या यशस्वी टीमचा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनेत्री स्नेहल तरडे, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे आणि निर्माते कैलास वाणी यांना ‘सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, विद्यावाचस्पती विद्यानंद, चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी व जुईली वाणी, वरिष्ठ पत्रकार किरण जोशी, माध्यम सल्लागार जीवराज चोले आदी उपस्थित होते.
सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरूड येथील सिटीप्राईड चित्रपटगृहात ‘देऊळबंद-२’ चित्रपटाचा विशेष विनामूल्य शो आयोजित करण्यात आला. यावेळी निर्माते कैलास वाणी व जुईली वाणी, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, चित्रपटातील कलाकार, तांत्रिक टीम, सूर्यदत्तचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात कलाकारांचा सत्कार करून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.
शेतकरी आत्महत्या या ज्वलंत विषयाला धरून असलेल्या ‘देऊळबंद-२’ने प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला आहे. श्रद्धा, संस्कृती, ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक मूल्ये यांची प्रभावी सांगड घालत या चित्रपटाने मनोरंजनासोबतच विचारप्रवर्तक आशयही मांडला आहे. प्रभावी कथा, दमदार संवाद, वास्तववादी अभिनय आणि तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार मांडणीमुळे हा चित्रपट सर्व स्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याची चर्चा होत आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, ”शेतकऱ्यांची करुण कहाणी मांडणारा ‘देऊळबंद-२’ चित्रपट आहे. यातून केवळ मनोरंजन नाही, तर भारतीय संस्कृती, श्रद्धा, समर्पण, सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष प्रभावीपणे मांडणारी कलाकृती आहे. समाजात सकारात्मक विचार रुजविण्याची ताकद अशा चित्रपटांमध्ये असते. शिक्षणाबरोबरच समाजाभिमुख संस्कार घडविण्याचे कार्य कला आणि साहित्य करतात.
त्यामुळे अशा दर्जेदार कलाकृती आणि त्यामागील कलाकारांचा गौरव करणे ही सूर्यदत्तची परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर समाजाशी जोडणाऱ्या आणि मूल्यांची जपणूक करणाऱ्या कलाकृतींकडूनही प्रेरणा घ्यावी. ‘देऊळबंद-२’सारखे चित्रपट सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करतात.”
प्रवीण तरडे म्हणाले, “महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांनी ‘देऊळबंद-२’ला भरभरून प्रेम दिले. हा सन्मान माझा किंवा स्नेहलचा नसून, संपूर्ण चित्रपटाच्या टीमचा आहे. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.
आशयप्रधान आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम मराठी चित्रपटांची नवी ओळख निर्माण करण्यात ‘देऊळबंद-२’ महत्त्वाची भूमिका बजावेल. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील ‘माईलस्टोन’ ठरेल, असा मला विश्वास आहे. या चित्रपटाच्या कमाईतून मिळणारा संपूर्ण नफा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला जाणार आहे.”
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान केले जातात.
त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाचा सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांना प्रदान करण्यात आल्याचे सुषमा चोरडिया यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रा. डॉ. मनीषा कुंभार, संचालिका, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि स्वप्नाली कोगजे, हेड ऑफ पीआर, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी केले.





