देऊळ बंद 2 : देवाच्या देवत्वाची खरी परीक्षा !
Deool Band 2:

2015 साली देऊळ बंद चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि तेव्हा तो लोकांना खूप आवडला होता विज्ञान आणि आध्यात्माची उत्कृष्ट सांगड आणि देवाचं अस्तित्व यावर भाष्य करणारा आणि राघव शास्त्री या शास्त्रज्ञाला त्याचं महत्त्व पटवून देणारा चित्रपट म्हणजे देऊळ बंद १. आता दुसऱ्या भागात पुढे काय दाखवणार याची लोकांना उत्सुकता होती आणि यावेळेस शेतकरी आणि त्याच्याशी निगडित असलेल्या असंख्य समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर थेट भाष्य करणारा चित्रपट म्हणजे देऊळ बंद भाग दुसरा….
एका आस्तिक शेतकऱ्याची नास्तिक बायको संगीता (स्नेहल तरडे ) थेट देवालाच त्याच्या अस्तित्वाबद्दल रोखठोक सवाल करून त्याला आपल्या सोबत गावी न्यायला आली आहे. नदीकाठी असलेल्या भल्या मोठ्या वारुळाजवळ ती आक्रोश करत डोळ्यातील आसवं गाळत थेट देवालाच आव्हान करत समोर प्रकट होण्याची आणि सोबत चलण्याचा आदेश देते.. तिचा आक्रोश पाहवला जात नाही आणि त्याच क्षणी स्वामी प्रकट होतात.. संगीता गावकऱ्यांसोबत तिच्या दिरासोबत स्वामींना घेऊन आपल्या गावी जायला निघते.. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी फक्त संगीतालाच दिसत असतात आणि प्रचंड प्रमाणात स्वामींना आपल्या टोकदार आणि धारदार संवादांनी प्रश्न करत मार्गस्थ होते. गावकऱ्यांना वाटतं की आता ही वेडी झाली आहे कोणाशी बोलते काही कळत नाही. परंतु गावात पोहोचल्यावर मात्र काहीतरी वेगळंच वाढून ठेवलेलं असतं…
इथून पुढे सुरु होतो नास्तिक असलेल्या संगीताचा आणि स्वामींचा थेट संघर्ष.. संगीता स्वामींना परीक्षा द्यायला भाग पाडते.. या परीक्षेत स्वामी पास होतात की नाही? स्वामींचे अस्तित्व ती मान्य करते की नाही? गावातील स्वामींचे देऊळ का बंद असतं ? संगीताच्या मनातील स्वामीं बद्दल असणारा तिरस्कार दूर होतो की नाही? त्यांचे अस्तित्व संगीता मान्य करते की नाही? तसेच शेतकऱ्यांची ज्वलंत समस्या म्हणजे आत्महत्या त्या थांबतात की नाही किंवा त्यासाठी काय उपाययोजना होतात हे पडद्यावर पाहणंच योग्य ठरेल….
कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन आणि सोबतच अभिनय अशा सर्व आघाड्यांवर प्रवीण तरडे हे यशस्वी ठरले आहेत. विषयाला साजेशी कथा आणि वेगवान पटकथा, सफाईदार दिग्दर्शन आणि जोडीला धारदार आणि टोकदार संवाद यामुळे चित्रपट वेगळीच उंची गाठतो. चित्रपटाची कथा ही फक्त शेतकऱ्यांची न राहता महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची व्यथा यावर थेट भाष्य करते.
समस्त जगाला अन्न खाऊ घालणारा हा जगाचा पोशिंदा मात्र आज त्याच्या अस्तित्वासाठी त्याच्या शेतीत अपार कष्ट करून पिकणाऱ्या मालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे, अवकाळी पाऊस, अस्मानी संकट, तुंबलेले कर्ज, निकृष्ट दर्जाचे बी बियाणे आणि त्यामुळे आलेली नापिकी, घरातील जबाबदाऱ्या यांनी घोर संकटात सापडला आहे आणि नाईलाजाने खचून जाऊन आत्महत्येला जवळ करणारा हा शेतकरी आणि त्याचे हतबल जगणे याचे प्रभावी चित्रण आपल्याला या सिनेमात पाहायला मिळते आणि आपण सुन्न होऊन जातो…
चित्रपटातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणजे संगीता पायगुडे जिची भूमिका स्नेहल तरडे यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि एकरूप होऊन सादर केली आहे.संगीताच्या डोळ्यांमधून शेताकऱ्यांची व्यथा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची घालमेल, तिला होणारा त्रास, शासनाच्या आणि व्यवस्थेच्या चौकटीत होणारी घुसमट दाखवण्यात स्नेहल तरडे यशस्वी ठरल्या आहेत…अत्यंत त्वेषाने आणि आवेशाने स्वामींना रोखठोक सवाल करणारी संगीता, स्वामींबद्दल आणि त्यांच्या भक्तीबद्दल असणारा द्वेष आणि तिरस्कार व्यक्त करणारी संगीता प्रचंड ताकदीने उभी केली आहे.. स्नेहल तरडे यांच्या अभिनयातील विविध पैलूंचे दर्शन देणारा हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरू शकतो..
स्वामी म्हणजेच मोहन जोशी हे जणू समीकरणच झाले आहे. नुकत्याच झालेल्या दीर्घ आजारावर जिद्दीने मात करून स्वामींच्या व्यक्तीरेखेत त्यांनी जान आणली आहे.
संगीताच्या तीक्ष्ण आणि तिखट प्रश्नांना अतिशय हसत खेळत स्वामी म्हणजेच आपले मोहन जोशी उत्तर देतात ते बघण्यासारखं आहे. त्यांच्या देहबोलीतून जणू काही प्रत्यक्ष स्वामीच बोलत आहेत याची प्रचिती येते.संगीताची अट म्हणजे कुठलाही जादूटोणा न करता माणूस म्हणून माणसात मिसळून ती परीक्षा देण्याचे आव्हान आणि त्यातील बारकावे मोहन जोशी सुंदररित्या वठवतात . मोहन जोशींची निवड कशी योग्य आहे हे त्यांच्या अभिनयातून सिद्धच होते.
सोबतच इतर कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू. मंगेश देसाई, प्रसाद ओक, ओम भुतकर,महेश मांजरेकर,संस्कृती बालगुडे, सविता मालपेकर इत्यादी कलाकारांनी आपापली भूमिका चोख पणे पार पाडली आहे.. चित्रपटाला साजेसे संगीत आणि पार्श्वसंगीत पण आहे..
एकूणच काय तर देवाचे अस्तित्व हे मानण्यावर आहे.. सगळ्यांशी चांगली वागणूक आणि लहान मुलांसारखं निरागस निर्मळ मन जर प्रत्येक माणसाचं झालंतर आपोआपच त्याचं नातं परमेश्वराशी जोडले जाईल आणि असं झालं तर हे जग खूप सुंदर होईल हा स्वामींचा विचार घेऊन सिनेमा शेवटाकडे जातो आणि जाता जाता देऊळ बंद 3 ची संकल्पना एका छान सरप्राईज द्वारे आपल्याला देऊन जातो..
राहुल सराफ
नागपूर
२६. ०५. २०२६



