बंगळुरूः कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात एका ७२ वर्षीय कर्करोग पीडिताने आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यास नाकारल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या केलेली कर्करोग पीडित व्यक्ती ही सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मृत व्यक्तीच्या कुटुबांतील व्यक्तीच्या म्हणण्यानुसार कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्यमान भारत जन आरोग्य या योजनेतून ५ लाखांचे विमान संरक्षण जेष्ठ नागरिकांना मिळते. या योजनेचे विमा सरंक्षण रुग्णालयाने नाकारल्याने या गोष्टीचा मोठा धक्का त्यांनी बसला. त्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांना उपचारांसाठी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत या जेष्ठ नागरिकाचे कार्ड तयार करून घेतल्याचे मयत व्यक्तीच्या कुटुबांतील सदस्याने एका इंग्रजी दैनिकाला याबद्दल माहिती दिली आहे. रुग्णालयाने खर्चावर ५० टक्के सूट दिल्याची देखील माहिती त्यांनी दिली. या प्रकरणावर रुग्णालयाने स्पष्टीकरण दिले असून प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य ज्येष्ठ नागरिक योजना अद्याप लागू झालेली नाही. आम्ही आदेशांची वाट पाहत आहोत, असे सांगितले आहे. काय आहे ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. तसेच उत्तम दर्जाच्या दवाखान्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत गरजूंना वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेता येतो.